कार्यक्रम २०२६

 

गणेशोत्सव २०२६

गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया !
|| गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ||


आषाढी एकादशीचा कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांनाच वेध लागतात ते आपल्या गणेशोत्सवाचे ! लहान मुलांच्या डान्सच्या मीटिंग पासून ते शेवटच्या प्रॅक्टिस पर्यंत अगदी धावपळ असते आणि मग तो दिवस उजाडतो ज्या दिवशी सादरीकरण असते.


ह्या वर्षीचा गणेशोत्सव सोहळा रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी हार्टलँड कम्युनिटी कॉलेज च्या ऑडिटोरियममध्ये मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमाची सुरूवात बाप्पांच्या पूजेने आणि आरतीने झाली. ह्या वर्षीच्या बाप्पांच्या पूजेचा मान मिळाला होता श्री व सौ हर्षांगी आणि अपूर्व परांजपे या जोडप्याला. सामूहिक आरत्यांच्या गजराने संपूर्ण सभागृह सुरुवातीपासूनच मंगलमय आणि पॉझिटिव्ह उर्जेने भरून गेले होते.


आता वेळ झालेली सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करण्याची, ज्याची सगळे जण आतुरतेने वाट बघत होते. सूत्रसंचालक सुकन्या भालेराव यांनी छोट्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात एकदम जोरदार केली.
पहिल्याच सादरीकरणामध्ये आपल्या २ वर्षांच्या चिमुरड्यांनी त्यांच्या भोळ्या भाबड्या डान्सने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्या लागोलाग आई आणि बाळांचा 'झुलवा पाळणा' अजून एक निरागस छाप प्रेश्नकाच्या मनात ठेवून गेली.
त्यानंतर वाढत्या वयोगटानुसार मुलांचे डान्स परफॉर्मन्सेस रंगत गेले आणि वातावरण एकदम जोशमय झाले. खरंच प्रत्येक गटाची गाण्यांची निवड, वेशभूषा आणि कोरिओग्राफी वाखाणण्याजोगी होती.


मध्यंतरानंतर रेश्मा अनभुले ह्यांनी मोठ्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाती घेतले आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली राजेश चलम ह्यांच्या सुरमयी मैफिलीने. एका मागोमाग एक सुंदर सदाबहार गाण्यांनी सगळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले. गाण्यांच्या या सुंदर मेजवानीनंतर मोठ्यांचे जोरदार डान्स झाले जे कि सगळेच परफॉर्मन्सेस वन्स मोर घेत गेले. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांमधून प्रत्येक कलाकृतीसाठी दाद आणि कौतुकाची थाप मिळत होती आणि खरंच आपल्या कलाकारांच्या मेहनतीचे चीज झाले असे वाटले.


कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला महाराष्ट्राची शान असलेल्या ढोल-ताशा-लेझीम ने नेहमीप्रमाणे एक अविस्मरणीय छाप सोडली. ढोल-ताशाचा दणदणाट आणि लेझीम चा खणखणाट ह्याने जो काही चैतन्यपूर्ण माहोल झाला; त्यात सगळ्यांनी मंचावर येऊन, थोडे बेभान होऊन नाचून, फुगड्या घालून ढोलताशाला भरघोस प्रतिसाद दिला. आता वेळ झाली होती हा आनंद मनात साठवत ह्या वर्षीच्या सोहळ्याचा निरोप घेण्याची !!


मराठीमंडळाचा गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती, उत्साह आणि एकता ह्या सगळ्यांचा एक अनोखा संगम आहे आणि आपली पुढची पिढी हे सगळे घेऊन मोठी होत आहे हे खरंच अभिमानास्पद आहे !! ब्लूमिंग्टन मराठी मंडळाचे असेच खूप सारे कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादाने दरवर्षी होत राहो, हीच गणराया चरणी प्रार्थना !!
"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!"

आपल्या मंडळाचे स्वयंसेवक नेहमीच घरचेच कार्य समजून प्रेमाने मनापासून काम करतात त्यांना मन;पूर्वक धन्यवाद !



स्वयंसेवक:

कार्यक्रम संयोजन -- रश्मी गोखले
कार्यस्थळ व्यवस्था -- गौरी आणि गौतम करंदीकर, अनुजा दुर्वास, गणेश भदाणे
तिकीटविक्री -- गौतम करंदीकर
ध्वनीसंयोजन - आशिष डहाके
गणेश पूजन आणि सजावट - हर्षांगी आणि अपूर्व परांजपे
सूत्रसंचालन -- रेश्मा अनभुले, सुकन्या भालेराव
मोदक प्रसाद -- वैशाली मालपाणी, अर्चना नाडकर्णी
अल्पोपाहार व्यवस्था -- प्रवीण फेंगडे, समीर आगरकर, आनंद आणि योगिता जाधव, वल्लरी जोशी, तृप्ती कोद्रे, प्रचिती नाईक, अनंत गोखले, विक्रांत चव्हाण, मयुरी कुलकर्णी, तनिषा पाटील, अमोल डोळ
भोजन व्यवस्था -- सुशील दुर्वास, केदार कुलकर्णी, रोहित काळे, अभिनव कुलकर्णी, गौरव चौक, राहुल ताम्हणे, राजेश तुमाला
बाल स्वयंसेवक -- शर्मन गोखले, अद्वय आगरकर, ऋषी आणि हर्ष काळे, ईशान कुलकर्णी

कार्यक्रम वृत्तांकन: रेश्मा अनभुले




कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२६ २०२५ २०२४ २०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००