गणेशोत्सव २००५ वृत्तांत


आपल्या प्रियजनांपासून शेकडो मैल दूर आल्यानंतरही मराठी संस्कृती, आपले सण साजरे करण्याची उर्मी आणखीनच वाढते असंच म्हणायला हवं. या हेतूला अनुसरूनच आपल्या मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लेझीमच्या मिरवणुकीने गणपती बाप्पांचे वाजत गाजत सभागृहात आगमन झाले. मग बाप्पांना त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या मखरात विराजमान करण्यात आले। त्यानंतर दणक्यात पार पडली ती बाप्पांची आरती.

यानंतर आपल्या मंडळाच्या वतीने काही करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले होते. अंजना भातखंडे यांनी बसवलेल्या ‘या वार्‍याच्या बसुनी विमानी सहल करूया गगनाची...’, तसेच अश्विनी देशपांडे यांनी बसवलेल्या ‘शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा...’ या गाण्यावर बच्चे कंपनीने नाच करून अगदी धमाल उडवून दिली. संत तुकाराम, शिवाजी महाराज, व श्यामची अैइ यांच्या गोष्टी छोट्या दोस्तांकडून सादर करुन घेतल्या दीपा जोशी यांनी. सर्व कार्यक्रमात भाव खाउन गेली ती पद्माकर डावरे लिखित आणि चंद्रशेखर वझे दिग्दर्शित ‘कायापालट’ ही एकांकिका. आहे त्या वयापेक्षा खूपच तरुण करण्यासाठी या नाटकातील डॉ. संजीवन यांनी लावलेल्या ‘नवचैतन्य’ वाटिका या गोळ्यांचा शोध आणि या गोळ्यांच्या सेवनाने घडणारे गमतीदार प्रसंग असे या एकांकिकेचे स्वरुप होते. नाटकातील सर्व कलाकारांचा अभिनय सुरेखच होता. नंतर सुनील मुंडले आणि त्यांचे सहकारी यांचे बुजगावणे नृत्य आणि लेझीम नृत्य तर लाजवाबच !

दरम्यान, श्री. मयुरेश देशपांडे यांनी अहवाल वाचन केले याशिवाय मुंबैइ आणि महाराष्ट्रभर अलिकडेच कोसळलेल्या धुवाधार पावसाने जी पूरस्थिती निर्माण उद्भवली होती, त्या पुरामुळे सर्वस्व उध्वस्त झालेल्या असंख्य महाराष्ट्रातील बांधवांना खारीची मदत म्हणून यावेळी मंडळातर्फे निधीही जमा करण्यात आला. हा निधी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री निधीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. अविनाश टकले आणि प्रिया केसकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचासन केले

कार्यक्रमाची छायाचित्रे

-अमृता सहस्त्रबुद्धे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००