पाडवा २०११

नमस्कार

या वर्षी ९ एप्रिलला मराठी मंडळाने ब्लूमिंग्टन हायस्कूल च्या सभागृहात गुढीपाडव्या निमित्त सादर केले ३ अंकी धमाल नाटक “जावई माझा भला”…!

नाटकाचे थोडक्यात कथानक पुढील प्रमाणे..
अविनाश व आसावरी या दांपत्याची रजत ही चिन्मय ही दोन अपत्ये…
रजत चे कॉलेज शिक्षण पूर्ण करून आता लग्नाची स्वप्ने पहाणारी..तर धाकटा चिन्मय कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकणारा…
वडिलांच्या ५० व्या वाढदिवसा दिवसानिमित्त रजत वडिलांना एक वेगळेच सरप्राईज गिफ्ट देते …
आपल्या मित्राची ओळख तुमचा भावी जावई अशी करुन देउन जरा धक्काच देते..
जोडे झिजवायला न लागता इतका चांगला जावई आयाताच मिळाला म्हणून आसावरी खुष असते..पण
अविनाश मात्र भावी जावयाच्या अनपेक्षीत भेटीने खुप अस्वस्थ होतात.
आपल्याला न विचारता लेकीने लग्नासारखा मोठा निर्णय स्वतंत्रपणे घेतला या विचारांनी अविनाशचे मन खट्टू होतं आणी त्या मुळेच ते या लग्नाला विरोध दर्शवितात.

अविनाशचा होणारा जावई “उत्पल” हा अतिशय उमदा ,सालस आणी हुषार असतो.तो आपल्या उद्योजक वडील राजा रामाणी यांच्या सहाय्याने काही कल्पक योजना आखतो आणी बरोबर आपल्या सासरे बुवांचे मन वळवतो.
लग्न तर ठरते पण पुन्हा लग्न कोणत्या पध्द्तीने करायचे, किती लोकांना बोलवायचे यावरून थोडी तेढ निर्माण होते मात्र उत्पलचे वडील सामंजस्याने मार्ग काढतात आणी शेवट गोड होतो.

तस पाह्यल तर नाटकाचे कथानक फारच सरळ साधे असतानाही प्रेक्षक तीनही अंकापर्यंत खिळून रहातात ते केवळ प्रत्येक प्रसंगाच्या उठावदार मांडणीने. एक एक प्रसंग सहज ओघाने घडत जातात .नाटक कुठेही रेंगाळत नाही, योग्य गतीने पुढे जात राहाते .नाटकातील अनेक प्रसंग इतके प्रभावी झाले आहेत की नाटक स्टेजवर नाहीतर आपल्याच घरात घडतय असं वाटतं

नाटकाच्या सादरीकरणा बरोबरच एक आणखी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक पात्राचा सहज सुंदर अभिनय.

अविनाशच्या मध्यवर्ती भुमिकेत होते दिग्दर्शक गौतम करंदीकर. लेकीच्या मायेत जावई वाटेकरी आल्यावर बापाची होणारी घालमेल गौतमनी जबरदस्त सादर केली आहे. काही नाट्यप्रसंगात विशेषत: जावया बरोबरच्या ड्रिंक्सच्या सीन मधे गौतमचा अभिनय आणी संवाद्फेक लाजवाब…. मनाला स्पर्शून जाणारा हा प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळवून गेला.

रजतची भुमिका उत्कृष्ठ्पणे सादर केली अनुराधा गोडबोले यांनी. रंगमंचावर प्रथमच वावरत असतानाही ती कुठेही नवखी वाटली नाही. नाटकातले तिचे हसणे ,रडणे, बोलणे सगळच अगदी सहज सुंदर अभिनयाने नटलेले. त्या मुळे तिचे काम खरच खुप प्रभावी झाले.

अनुराधा प्रमाणेच नाटकात प्रथमच पदार्पण करणारा चिन्मयच्या भुमिकेतील समीर आगरकर याचाही अभिनय मिश्किल, खेळकर, खोडकर धाकट्या भावाला अगदी साजेसा ….!समीरचं संवादाचे टायमिंग, रंगमंचावर सहज वावरणं, विशेष उल्लेखनीय जावयाच्या प्रमुख भुमिकेत होता दमदार रोमेल पारसनीस. रोमेलला नाटकाचा पुर्वानुभव नसतानाही रंगमंचावर प्रदीर्घ अनुभवसंपन्न गौतम करंदीकरां सारख्या अभिनेत्या बरोबर वावरताना रोमेल कुठेही बुजलेला दिसत नाही. उलट जावई आणी सासरेबुवांच्या काही चमकदार प्रसंगातील त्याचा अभिनय प्रसंगाला आणखीनच धार आणतो.

गौरी करंदीकरांनी साकारली होती “आसावरी” .मुलीची समजुत काढणारी समंजस आई , नव-याच्या हट्टी वागण्याने दुखावलेली पण त्याच वेळी त्याच्या तशा वागण्या मागची योग्य तर्कसंगती शोधणारी पत्नी,जावयाच्या आगमनाने सुखावलेली सासु, ही नाटकात असलेली विविध नाती गौरीने सहजपणे सादर केली. या वर्षी विशेष म्हणजे गौरीने प्रत्येक एंट्रीला नेसलेल्या साड्यांसाठी महिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.

सोनाली कर्णीक् ने श्रीमंतीचा माज असलेली “राणी रामाणी” हे वरमाय ..अर्थात उत्पलच्या आई चे पात्र एकदम ठसक्यात रंगवले. तिचे दिसणे, वागणे, बोलणे भुमिकेला एकदम साजेसे. निनाद वैद्य होते “ राजा रामाणी ” च्या भुमिकेत. उत्पलला लग्नासाठी मनापासुन पाठींबा देणारे, मुलाला मित्रासारखी मदत करणारे वडील निनादने खुप छान सादर केले. त्याचे समंजस , भारदस्त व्यक्तीमत्व भुमिकेला एकदम पूरक ठरले.

नाटकात अतीशय छोटीशी भुमिका असुनही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात रहाणारे पात्र म्हणजे मंदार कुलकर्णीने उभा केलेला कॉन्ट्रॅक्टर गावडे. कॉन्ट्रॅक्टर गावडेची १० -१५ मिनिटांची फक्त दोन वेळा एंट्री होती पण दोन्ही वेळा मंदारने प्रेक्षकांकडून पसंतीच्या टाळ्या घेतल्या.

अविनाश च्या बॉसच्या ..म्हणजेच गडकरी साहेब यांच्या भुमिकेतील प्रसन्न माटे यांचा अभिनय भुमिकेला साजेसा ...!

चिन्मयच्या भावी वधुच्या लहानशा भुमिकेत होती पाहुणी कलाकार शर्मिला आगरकर

या वर्षीच्या नाटकाचे नेपथ्य विशेष उल्लेखनीय होते. यातले ठळक वैशीष्ठ्य म्हणजे घराचे प्रवेशद्वार. प्रत्येक पात्राच्या एंट्रीला उघडणारा, कडी असणारा दरवाजा होता , एंट्रीचा पॅसेज लेव्हल वर होता त्याने नाटकाच्या सेट्ला खुप शोभा आली.

यंदाची प्रकाश योजनाही विशेष उल्लेखनीय . स्पॉटलाईट च्या वापराने प्रसंग खुप उठावदार झाले. आणखी एक नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे एरवी नाटकात असलेले फोनचे संभाषण दाखवताना फक्त स्टेजवरील पात्राचा आवाज येतो..पण यंदा ध्वनीसंकलक आशीष डहाके यांनी टेलीफोनवर दुस-या टोकावरोन बोलणा-या पण रंगमंचावर नसणा-या पात्राचे संभाषण सुद्धा ऐकता येइल असे फोनच्या सीन चे सादरीकरण करून एक वेगळा प्रयोग यशस्वी करून दाखवला.

नाटकात पुढे काय होईल याचा अंदाज करने कथेच्या साधे पणा मुळे सहज शक्य असतानाही नाटक प्रेक्षणीय करून प्रेक्षकांची उत्सुकता कायम वाढवत ठेवणे ही अर्थातच दिग्दर्शकावरची मोठी जबाबदारी. ही जबाबदारी गौतम करंदीकरांनी आपल्या प्रगल्भ दिग्दर्शनाने अत्यंत यशस्वीपणे पार पाडली . अशा प्रकारे साध कथानक असतानाही, कल्पक नाविन्यपूर्ण नेपथ्य,सुयोग्य प्रकाशयोजना ,सुंदर पार्श्वसंगीत आणि टेलेफोनचा दुहेरी संवाद , सर्व कलाकारांचा उत्तम अ्भिनय, या सर्वाचा एकत्रीत परीणाम म्हणून हे नाटक एक सुंदर आविष्कार ठरले.

श्रेयनामावली

दिग्दर्शक गौतम करंदीकर
दिग्दर्शन सहाय्य विशाल डहाळकर, गौरी करंदीकर
कलाकार गौतम करंदीकर, गौरी करंदीकर, समीर आगरकर, अनुराधा गोडबोले, रोमेल पारसनीस, सोनाली कर्णीक, निनाद वैद्य, प्रसन्न माटे, मंदार कुलकर्णी, शर्मीला आगरकर
पार्श्वसंगीत आशीष डहाके
नेपथ्य अनुप तापकीर, मोहीत पोतनीस, विनोद म्हसे
प्रकाश योजना विशाल डहाळकर, विनोद म्हसे
विशेष सहाय्य प्रणाली पारसनीस, शर्मिला आगरकर
नाटक पोस्टर अभिजीत कर्णिक
व्हिडिओ चित्रण अनंत गोखले, राहुल झगडे, पराग काजरोळकर
फोटो रोहन गुर्जर, सागर पाटील, उमेश बिहाणी
तिकिट विक्री अभिजीत शेंडे, अनंत गोखले, निवेदिता कुलकर्णी, अभिजित नेरुरकर, सुशील दुर्वास
प्रवेशद्वार सजावट अनुजा दुर्वास
बेबी सिटिंग सहाय्य दिपाली देशपांडे, रती पेडणेकर, कार्तिकी झा, अर्चना नाडकर्णी
अल्पोपहार व्यवस्था साचिन बुचे, उदय परांजपे, अभिजित नेरुरकर, अभिजित शेंडे
कार्यक्रम संयोजक केदार भागवत
नाट्यपरीक्षण आश्लेशा राउत

नाटकाचे पोस्टर     
नाटकाची छायाचित्रे 


धन्यवाद
आश्लेशा राउत
ब्लुमिंग्टन—नॉर्मल मराठी मंडळ

 


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००