कार्यक्रम २००५

“डॉ. तुम्हीसुद्धा”चे अटलांटतील यश

दि. २ जुलै २००५ दुपारचे ४-३० वाजले आहेत. अटलांटा येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २५ व्या अधिवेशनातला Big Hall. टाचणि पडली तरी ऐकू येईल अशी शांतता. नांदी नंतर धीरगंभीर आवाजातल्या पात्रपरिचयानंतर, ४५० ते ५०० रसिकांच्या साक्षीने सुरू होते, प्रत्येक ब्लूमिंग्टनवासी मराठी भाषिकाची मान अभिमानाने ऊंच व्हावी, छाती गर्वाने फुलून यावी अशी घटना. “ब्लूमिंग्टन इलिनॉय् सादर करीत आहे - डॉ. तुम्हीसुद्धा”.

प्रसंगानंतर प्रसंग होत जातात. नाटकाती प्रेक्षकांवरील पकड घट्ट होत जाते आणि एक तासाच्या या सणसणीत, वैचारिक, खिळवुन टाकणार्‍या नाट्यानुभवाला अमेरिकेतून जमलेले ते रसिक टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून मानवंदना देतात.

होय! मित्रांनो, आपल्या ब्लूमिंग्टन् नाट्यमंडळाने अटलांटातील अधिवेशन गाजवले. “डॉ. तुम्हीसुद्धा”चा दर्जेदार प्रयोग सादर करून, अटकेपार झेंडा लावला.

प्रयोग संपला. प्रत्येक ब्लॅकआऊटला पडलेल्या टाळ्या अजून कानात गुंजत होत्या. स्टेजजवळ चाहत्यांची, रसिकांची गर्दी झाली होती. कुणी नाटकाच्या निवडीची, सादरीकरणाची प्रशंसा करत होते, तर कुणी कलाकारांच्या अभिनयकौशल्यावर खुष होता. कुणी डोळे पुसत आमच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत होता, तर कुणी नाटक ३ अंकी का नाही केले अशी तक्रार करत होता. इतरत्र प्रयोग करण्याची आमंत्रणे मीळत होती. संगीत, प्रकाशयोजनेवरही मंडळी खूष होती. आणि कौतुक वर्षावात भिजलेले, या सगळ्या अनोळखी माणसांच्या अकृत्रिम प्रेमाने गहिवरलेले आमचे कलावंत आणि तंत्रज्ञ यांना ही अविस्मरणीय संध्याकाळ कघी संपूच नये असं वाटत होतं. यशाचे पडसाद अधिवेशनात उमटले, अधिवेशनात मान्यता मिळली. आपल्या ब्लूमिंग्टनचे नाव अमेरिकेच्या नकाशावर नव्याने लिहीलं गेलं.

अधिवेशनात उरलेले दोन दिवस कसे संपले ते कळलेच नाही आणि २ जुलैला तृप्त अधिवेशनातला सर्वोत्तम कार्यक्रम असा किताब मिरवीत पुढच्या अधिवेशनात Main Theater मध्ये तीन अंकी नाटक करायचेच असा निश्चय करीत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

डॉ. तुम्हीसुद्धा.

लेखक – अजित दळवी. दिग्दर्शक – गौतम करंदीकर.
संगीत – संदीप गोरे. प्रकाश – अरविंद माळी.

कलाकार –

सुनील मुंडले गौरी करंदीकर
राहुल शिंदे नचिकेत सरदेसाई
वासुदेव कारुळकर दीपा जोशी
शैलेश जोशी अनुराधा गोरे
शिल्पा अडबे सचिन अडबे