ब्रह्मविद्या

 

ब्लुमिंग्टन् नॉर्मल मराठी मंडळप्रेरणा ग्रुपच्या तर्फे ब्रह्मविद्या परिचय असा छोटासा कार्यक्रम ब्लुमिंग्टन् ग्रंथालयात दिनांक २२जून २०१० रोजी आयोजित
करण्यात आला होता.

ब्रह्मविद्ये बद्दल माहिती देण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मविद्येचे शिक्षक श्री.वसंत जोशीवसुधा जोशी यांनी ब्रह्मविद्ये संबंधी प्राथमिक माहिती श्रोत्यांना दिली. कार्यक्रमाची सुरवात ब्रह्मविद्येच्या प्रथेनुसार प्रार्थनेने झाली.

आश्लेषा राऊत यांनी प्रथम या जोशी दाम्पत्याची ओळख करून दिली. हे दोघेही पुण्याचे रहिवासी असून त्यांचे अमेरिकेत वरचेवर येणे होते. ब्रह्मविद्येचा अभ्यासक्रम दोघांनी २००३ पासून सुरु केला. प्राथमिक वर्ग, प्रगत वर्ग, प्रदीपक वर्ग, शिक्षकांचे workshop असे सर्व अभ्यासक्रम संपवून आता ते शिक्षक झाले आहेत. पुण्यात त्यांनी मराठीतून प्राथमिक वर्ग घेतले. तसेच अमेरिकेतील ब्लुमिंग्टन् मध्ये व
क्यालीफोर्नियात इंग्रजीतून ब्रह्मविद्येचे वर्ग घेतले आहेत.

श्री वसंत जोशी यांनी ब्रह्मविद्येचा मूळ उगम भारतात कोठे झाला आणि नंतर त्याचा प्रवास भारताबाहेर कसा झाला व ती विद्या भारतात कशी परत आली हा इतिहास थोडक्यात समजून सांगितला. त्यानंतर सौ वसुधा जोशी यांनी ब्रह्मविद्या म्हणजे नेमके काय, त्याची मुलभूत तत्वे कोणती आणि ही विद्या कोणत्या सिद्धांतावर आधारलेली आहे याचे थोडक्यात पण अतिशय सोप्या व श्रोत्यांना चटकन कळेल अशा भाषेत माहिती दिली. ब्राह्मविद्येत मुख्यतः श्वास आणि विचार या कधीही जीवनात न थांबणाऱ्या गोष्टींवर विशेष जोर दिला जातो. या करिता प्राणायाम व श्वसन प्रकार तसेच ध्यान याचा सराव या ब्रह्मविद्येच्या अभ्यासक्रमातून शिकवला जोतो. ब्रह्मविद्येच्या पद्धतींचा सराव करून शारीरिक व मानसिक पातळीवर मनुष्य कसा आरोग्य संपन्न होऊ शकतो व अध्यात्मिक वाटचाल कशी सुरु होऊ शकते याबद्दलही चांगले मार्गदर्शन केले. याशिवाय सौ वसुधा जोशी यांनी श्रोत्यांना काही श्वसन प्रकारांचे आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक ब्रह्मविद्येचे साधक नीरज जोशी यांच्या सहकार्याने करून दाखविले. तसेच श्रोत्यांच्या कडूनही करवून घेतले.

ब्लुमिंग्टन् येथे ब्रह्मविद्येचा प्राथमिक अभ्यासवर्ग पूर्ण केलेले काही साधक या कार्यक्रमाला उपस्थित होते. शैलजा शिर्सालकर, शशीताई कुलकर्णी व राजेंद्र जोशी या साधकांनी आपले सकारात्मक अनुभव कथन केले.

श्री वसंत जोशी यांनी नंतर ब्रह्मविद्या ही कशी विज्ञानावर आधारित आहे हे सांगताना ब्लूमिन्ग्तन मधील प्रसिद्ध Healthy Cells मासिकातील उत्पादक श्वसन संबंधीच्या लेखाची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यान्तर्फे शिल्पा लोम्बार यांनी आपले विचार व्यक्त केले व ब्रह्मविद्येचे साधक श्री राजेंद्र जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली. सर्वाना हा कार्यक्रम आणि त्यातून मिळालेली ब्रह्मविद्येची माहिती खूपच उदबोधक वाटली.

आश्लेषा राऊत


कार्यक्रमाची छायाचित्रे

 




कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००