“स्वरसंध्या” वृत्तांत

मराठी मंडळातर्फे ११ जून रोजी नॉर्मल टाऊनशिप हॉल येथे “स्वरसंध्या” ही बहारदार मैफिल सादर झाली. या सुरेख संध्याकाळी आपल्याला स्वरांची मेजवानी दिली ती अमित देशपांडे आणि प्रीती चलवादी यांनी.

संक्रांतीच्या कार्यक्रमात अमित देशपांडे यांनी गायलेली गाणी रसिकांना इतकी आवडली की अमित यांच्या गाण्यांचा “स्वरसंध्या” हा एक स्वतंत्र कार्यक्रम मंडळाने आयोजित केला. आणि या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या रसिकांना एक सुंदर स्वर मैफिल अनुभवता आली.

मंदार कुलकर्णी यांनी केलेल्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रम चांगलाच खुलला. त्यांनी गायकांची औपचारिक ओळख करून दिली आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली “वक्रतुंड महाकाय” ह्या श्लोकाने.

अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी अजरामर केलेले “शुक्रतारा मंदवारा” हे तरल भावगीत सादर करून अमित आणि प्रीती यांनी मैफिलीची सुरेख सुरुवात केली.

ह्यानंतर एकामागून एक धम्माल गीते सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘तुम ही हो’, ‘दगाबाज रे’, ‘ओ रे पिया’, ‘खईके पान बनारसवाला’ या गीतांना स्वरसाज चढवून अमित यांनी प्रेक्षकांना खुश केले.

प्रीती यांनी गायलेल्या ‘पिया तू अब तो आजा’, ‘आवारा भंवरे’, ‘कैसी पहेली है ये’ या गाण्यांना रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शिवाय ‘दिवाना हुआ बादल’, ‘कोरा कागज था ये मन मेरा’, ‘हुजूर इस कदर’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘शोखियों में घोला जाये’, ‘झुबी डुबी’, ‘1234 get on the dance floor’, ‘उह ला ला, उह ला ला’ या duet गीतांना सुद्धा रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

जोगवा चित्रपटातील “जीव दंगला, गुंगला, रंगला असा” या गीताने once more मिळवला नसता तरच नवल! “जय जय शिव शंकर” ह्या गीताने तर प्रेक्षकांना ताल धरायला लावला.

कार्यक्रमाची उत्तम ध्वनीव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी चोखपणे बजावली नागेश गालपल्ली यांनी. शिवाय कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासा आशिष डहाके ,अक्षय साटम ,शिरीष राणे, या कार्यकर्त्यांची खूप मदत झाली.

अशी बहारदार मेजवानी अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल मराठी मंडळ, अमित देशपांडे, प्रीती चलवादी, नागेश गालपल्ली, मंदार कुलकर्णी यांचे सर्व रसिकांतर्फे पुनश्च मनःपूर्वक आभार !

सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद .

----- सुखदा खोंबारे

कार्यक्रमाचे फोटो