कार्यक्रम २००७ - संक्रांत


तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून आप्तमित्र, नातेवाईक यांच्याशी परस्पर स्नेह दृढ करणारा दिवस म्हणजेच मकर संक्रांत. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यावर्षीही ब्लुमिंग्ट्न-नॉर्मल मराठी मंडळाने हा सण हळदीकुंकू, कलाप्रदर्शन, विविध गुणदर्शन आणि सर्वात शेवटी स्नेहभोजन असा भरगच्च कार्यक्रम करुन उत्साहात साजरा केला.

कार्यक्रमाची सुरूवात झाली ती "ताक् धिना धिन्" या मराठी गाण्यावर आधारित कार्यक्रमाने. "नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा..." या श्वेता जामसांडेकर यांनी सादर केलेल्या गीताने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. भक्तीगीत, नाट्यसंगीत, लावणी अशा विविध गीतप्रकारांचा समावेश या कार्यक्रमात उत्कृष्ट रितीने केला होता. अजिता खांडेकर यांनी गायलेले "खेळ मांडियेला वाळवंटी घाई...", आरती कुलकर्णी यांनी सादर केलेले "मम् आत्मा गमला..." आणि मानसी जोशी-सिंघ यांनी सादर केलेले "वद जाऊ कुणाला शरण..." या दोन नाट्यगीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय शिल्पा वाघ यांनी म्हटलेली "बुगडी माझी सांडली ग..." आणि प्राची परांजपे यांची "फड सांभाळ तुर्‍याला ग आला..." या लावण्यांना तर प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. कार्यक्रमाचे निवेदन लेखन केले होते गौरी करंदीकर यांनी आणि सादर केले अश्विनी देशपांडे व अनुराधा गोरे यांनी. गाण्याला अनंत गोखले, पेटी-ढोलकीवर प्रसाद जोशी आणि तबला-पेटीवर प्रसन्न माटे यांची अप्रतिम साथ लाभली.

त्यानंतर पद्माकर डावरे लिखित आणि गौरी करंदीकर दिग्दर्शित "शिवधनुर्भँग" ही एकांकिका सादर करण्यात आली. एका महिला मंडळाने बसविलेल्या "सीता स्वयंवर" या नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी प्रयोगाची तयारी करताना पडद्यामागे होणारे विनोदी प्रसंग असे या एकांकिकेचे स्वरूप होते. एकांकिकेत सहभागी झालेले कलाकार होते भाग्यश्री भोंडे, अमृता सहस्रबुद्धे, मयुरा सत्तूर, सरिता सावंत, अनुजा जाधव, नंदिनी पुसाळकर, सोनल पाटील, मानसी साठे आणि मेघना बेंद्रे. नाटकाची रंगभुषा आणि वेषभुषा होती आदिती साठे यांची. या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय करून एकांकिका फारच चांगल्या प्रकारे सादर केली.

त्यानंतर श्री. गौतम करंदीकर यांनी वर्ष २००७-०८ यासाठी निवडलेल्या मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. याचबरोबर त्यांनी मंडळाच्या संकेत-स्थळाची (website) नवी आवृत्तीही जाहीर केली. नव्या आवृत्तीबद्दल आपला अभिप्राय जरुर कळवा.

नंतर वेदवती गोखले यांनी कथ्थक नृत्याचा एक तुकडा उपस्थितांपुढे सादर करून सगळ्यांची दाद मिळवली.

"देश रंगीला. . . "हे समुह नृत्य यानंतर सादर करण्यात आले. दक्षिण भारत, प. बंगाल, काश्मीर, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब या राज्यांशी संबंधित गाण्यांवर नृत्य करून "मेरा भारत महान" असा जणू संदेशच त्यांनी दिला. या नृत्यात दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व केले होते मंजुषा कळाशीकर व दिप्ती गुप्ता यांनी, तर प. बंगालची ओळख करून दिली मीनल गुर्जर आणि दीपा होले यांनी. भारताच्या नंदनवनाची अर्थात काश्मीरची सफर घडवली मोहना खेर आणि आश्लेषा राऊत यांनी. महाराष्ट्राची मराठमोळी लावणी ठसक्यात पेश केली सुनयना मोहिते व स्वरूप कांबळे यांनी. गुजरात राज्याचे प्रतिनिधित्व केले वैशाली काचोळे आणि ज्योती शिंदे यांनी तर शेवटी बल्ले बल्ले पंजाबची ओळख करून दिली दुलारी ठाकुर आणि अक्षता कामत यांनी. नृत्यरचना केली होती दुलारी ठाकुर आणि स्वरूप कांबळे यांनी तर ध्वनीसंकलन व विशेष सहाय्य होते आनंद शिंदे यांचे.

दरम्यान, यावेळी कोलाज आणि छायाचित्र प्रदर्शनही भरविण्यात आले होते. यामध्ये कोलाज प्रदर्शनात १ ते ७ वयोगटातील बच्चे कंपनीने सुंदर सुंदर हस्तनमुने मांडले होते. अनुजा टोणपे, ध्रुव गोखले, रूता कान्हेरे, रूजुता दुर्वास, आदित्य नरसाळे, मीरा वाघ, आशिष ठाकूर, रूचा खेर, सानवी होले, मनाली पुसाळकर, साची टेके, सानिका कुलकर्णी, अभिरू राउत, पूर्वा आडके, अदिती शिंदे, राधा वाघ, रुची डिके, देवेँद्र काचोळे, स्वराज सोनावणे, सुह्रुद राउत, गौरी खेर, अनामय देशपांडे, मानसी साठे, पल्लवी परांजपे आणि कुणाल सामंत या छोट्या दोस्तांनी फिश कोलाज, फूड पिरॅमिड, मोहरी व डाळीँपासून बनवलेल्या इमारती, सिरियल्सचा वापर करून काढलेले ए बी सी डी, क्रेप पेपर आणि वुलनचा वापर करून बनवलेली अनेकविध कोलाज सर्वाँचे लक्ष वेधून घेत होती. छोट्या दोस्तांबरोबरच श्रीमती शैलजाताई शिरसाळकर आणि आनंद शिंदे यांचेही हस्तनमुने अतिशय सुंदर होते. कोलाज प्रदर्शनाची समन्वयक होती अनुजा दुर्वास आणि विशेष सहाय्य होते माधुरी माटे, निवेदिता कुलकर्णी व तेजस्विनी बुचे यांचे.

अनुजा दुर्वास, उपेन्द्र वाघ, समीर बेँद्रे-मेघना बेँद्रे, आनंद शिंदे, संदीप गोरे, मयुरेश देशपांडे, सोनाली परांजपे, निखिल कुलकर्णी, राजीव बाजवाला, समीर दंडगे-शीतल दंडगे आणि नचिकेत सरदेसाई यांनी स्वत: काढलेल्या छायाचित्रांचे काही नमुने प्रदर्शनात मांडले होते. छायाचित्र प्रदर्शनाची समन्वयक होती आदिती साठे तर विशेष सहाय्य होते सोनाली परांजपे आणि भाग्यश्री सरदेसाई यांचे.

कार्यक्रमासाठी तिळगुळ बनविण्याचे काम पार पाडले वेदवती गोखले, सोनाली डिके, ईशा दंडवते, अश्विनी देशपांडे, सोनाली परांजपे, शिल्पा वाघ, अनुजा दुर्वास व गौरी करंदीकर यांनी तर हळदीकुंकू देण्याचे काम केले कनका सामंत, ईशा दंडवते आणि प्रिया मुकादम यांनी. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाची स्नेहभोजनाने सांगता झाली.

ध्वनी संयोजन, भोजन व्यवस्था, छायाचित्रण आणि इतर सर्व व्यवस्था नवीन कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी उत्तम रीतीने पार पाडली. या कार्यक्रमाचे मुख्य व्यवस्थापन केले गौरी करंदीकर यांनी.

- अमृता सहस्रबुद्धे.

कार्यक्रमाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००