वाचक लिहितात - केरळ सहल
भारतात सुट्टीसाठी आम्ही नुकतेच जाउन आलो. येथूनच ठरविल्याप्रमाणे आम्ही सहा दिवसांसाठी केरळचे बुकिंग केले. या प्रवासास मी, माझी पत्त्नी चेतना व मुलगा चिन्मय असे पनवेलहून कोचिनला रेल्वेने गेलो. रेल्वेने जाण्याचा उद्देश कोकण रेल्वेचे सौंदर्य बघणे, बोगद्यांचा आनंद लुटणे हा होता.कोचिनला अथांग समुद्रकिनारा लाभला आहे. नुकत्याच येउन गेलेल्या सुनामीच्या खुणा आजही जाणवत होत्या. येथे चायना नेट फिशींग, कोचिनचा किल्ला हे बघण्यासारखे आहे. फ्रान्सीस चर्च हे युरोपिअन स्टाइलचे भारतातले एकमेव चर्च आहे.
दुसर्या दिवशी पहाटे आम्ही पेरियारसाठी मार्गस्त झालो. पेरियारचे अभयारण्य फारच सुंदर आहे. बोटीच्या सफरीतून जंगल बघण्याची मजा काही औरच!! या जंगलात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केरळची बाजारपेठ मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे व स्पाइस गार्डनही बघण्यासारखे आहेत. या सगळ्यात खरेदीसाठी वेळ बाजूला ठेवायला विसरू नका!
पेरियार ते आल्पी हा संपूर्ण रस्ता नागमोडी वळणांचा आहे. घनदाट जंगल, चहाचे मळे असा ३ तासांचा सुंदर प्रवास केव्हा संपतो ते समजतच नाही.
हाउसबोटीसाठी प्रसिद्ध असलेले आल्पी हे ठिकाण. या बोटीवर रात्रभर रहाणे म्हणजे वेगळाच आनंद. दोन बेडरूम्सच्या या बोटीवर आपल्यासोबत तीन लोकांचा सेवकवर्ग असतो. बोटीवरील जेवण म्हणजे केरळीयन जेवणाची फीस्टच् ! किनार्यापासून २०-२५ सागरी मैलावर बोट रात्री मुक्कामासाठी थांबते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्यासोबत इतरही ८-१० बोटी मुक्कामासाठी असतात. केरळमधील बरीचशी खेडी पाण्यातच आहेत व पाण्यानेच जोडली गेली आहेत. वाहतुकीसाठीही बोटींचाच वापर केला जातो. काही वेळा तर एका घरातून दुसर्या घरात जाण्यासाठीसुद्धा होडीचाच उपयोग करावा लागतो.
वरील प्रत्येक ठिकाणी दोन दिवस मुक्काम केल्यावर परतीचा प्रवास विमानाने केला. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते... कोचिन विमानतळ फारच सुंदर असून कडेला लावलेली उंच नारळाची झाडे नितांत सुंदर दिसतात.
या प्रवासवर्णनाच्या साहित्यिक अंगापेक्षा यातील माहितीवर जास्त भर देऊन आपल्या देशातील या नंदनवनाला आपण जरूर भेट द्यावी.
- अभि शेंडे.
केरळ सहलीची छायाचित्रे