सुभाषिते

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती |
तस्यांहिकाव्यंमधुरंतस्मादपिसुभाषितम्॥


सर्व भाषांमध्ये संस्कृत (देवांची भाषा) हि मधुर आहे.
त्यातील काव्य हे तर मधुर आहेच पण त्याहिपेक्षा सुभाषित अतिशय गोड आहे .

(श्रीस्वरूप जोशी यांच्याकडून)
अति परिचयात् अवज्ञा संततगमनात् अनादरो भवति |
मलये भिल्लपुरंध्री चंदन तरुकाष्ठम् इंधनम् कुरुते ॥


अति परिचयामुळे अवज्ञा होते. (एकेठिकाणी) सतत गेल्याने अनादर संभवतो
(ज्याप्रमणे) मलय पर्वतावर भिल्ल स्त्री चंदनाच्या लाकडांचा इंधन म्हणून वापर करते.

(अभिजीत नेरुरकर यांच्याकडून)

कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्|
बान्धवा: कुलम् इच्छन्ति मिष्टान्नम् इतरे जना: ॥

(मुलीच्या लग्नात) मुलगी वराच्या रुपाला वरते, मुलीची आई त्याच्या पैशाकडे तर वडील त्याच्या गुणांकडे पहातात नातलग चांगल्या कुळाची अपेक्षा करतात आणि इतर सर्व लोक केवळ चांगल्या जेवणावर नजर ठेवतात.

(अभिजीत नेरुरकर यांच्याकडून)
दुर्जनेन समं सख्यं प्रीतीं चापि न कारयेत् |
उष्णो दहति चांगारः शीतः कृष्णायते करम् ॥

दुर्जन लोकांशी मैत्री किंवा जवळचे संबंध ठेवू नयेत (कारण ते कोळशासारखे असतात)
गरम असले तर भाजतात, आणि थंड असले तरी हात काळे करतात.

(श्रीस्वरूप जोशी यांच्याकडून)

अलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम्|
अधनस्य कुतो मित्रम्, अमित्रस्य कुत: सुखम् ॥

आळशी माणसाला विद्या प्राप्ती होत नाही, विद्या नसलेल्या माणसाला धन मिळत नाही.
निर्धनाला मित्र मिळत नाहीत आणि अशा मित्र नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार?

(अभिजीत नेरुरकर यांच्याकडून)

पृथिव्याम् त्रिणि रत्नानि जलम्, अन्नम् , सुभाषितम् |
मुढै पाषाण खन्डेशु रत्न संज्ञा विधीयते ॥

पृथ्वीतलावर तीन रत्न आहेत. जल, अन्न आणि सुभाषित.
परंतु मुर्खजन दगडाच्या तुकड्याला रत्न म्हणून संबोधतात.

(अभिजीत नेरुरकर यांच्याकडून)


संक्षिप्त रामायण -
आदौ राम तपोवनादि गमनं हत्वा मृग कांचनं |
वैदेहि हरणं जटायू मरणं सुग्रीव संभाषणं ॥
वाली निर्दलनं समुद्र तरणं लंकापुरी दाहनं|
पश्चात् रावण कुंभकर्ण हननं एतद् हि रामायणं ॥

आधी श्रीराम तपोवनात गेले. त्यानंतर सोनेरी हरिण मारले.
सीतेचे हरण झाले. जटायूचे मरण, सुग्रीवा बरोबर संभाषणं झाले.
वाली वध केला. समुद्र पार केला. लंका जाळली.
त्यानंतर रावण, कुंभकर्ण यांचा नाश केला. असे हे रामायण घडले.

(श्रीस्वरूप जोशी यांच्याकडून)

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः|
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ॥

उद्योग केल्यानेच कार्य सिद्धिस जाते (पूर्ण होते), नुसतं मनात आणण्याने नाही;
(ज्याप्रमाणे) झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप येऊन पडत नाही.

(श्रीस्वरूप जोशी यांच्याकडून)

विद्या विवादाय धनं मदाय शक्तिः पऱेषां परपीडनाय|
खलस्यः साधोः विपरितम् एतद् ज्ञानाय दानाय च रक्षणाय ॥

दुर्जन लोक विद्येचा उपयोग विवादासाठी, पैशाचा उपयोग उन्मत्तपणा दाखविण्यासाठी, आणि शक्तिचा उपयोग इतरांना त्रास देण्यासाठी करतात. याउलट सज्जन लोक मात्र यांचा उपयोग ज्ञान देण्यासाठी, दान देण्यासाठी आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी करतात.

(श्रीस्वरूप जोशी यांच्याकडून)