कार्यक्रम २००७ - पाडवा


ब्लुमिंग्ट्न नॉर्मल मराठी मंडळाच्या वतीने दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यावर्षीही गुढीपाडव्यानिमित्त सुप्रसिदध नाटककार कै. वसंत कानेटकर लिखित "प्रेमाच्या गावा जावे" हे तीन अंकी नाटक सादर करण्यात आले.

एखादे कुटुंब म्हटले की, त्यामध्ये काही ना काही अडचणी, कलह, मतभेद हे असणारच. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कुटुंबातील प्रत्येकाने त्या शांतपणे विचार करुनच सोडवायला हव्यात, हे सांगणारे ८० च्या दशकातील हलकेफुलके, नर्मविनोदी पण तरीही त्यातून बरेच संदेश देणारे हे नाटक.

हे नाटक घडते ते सरनोबत कुटुंबामध्ये. बँकेत अधिकारी पदावर असणारे चिंतामणी सरनोबत, त्यांच्या पत्नी सुमंगल आणि त्यांची तीन अपत्ये विनायक उर्फ टिटू, गौरी आणि धाकटे चिरंजीव गजानन उर्फ गोट्या असे हे सरनोबत कुटुंब.

आपली मुले काही चांगले करु शकणारच नाहीत असा मुलांबद्दल अविश्वास वाटणारे चिंतामणी सरनोबत,क्रिकेट हेच ध्येय असणारा,त्यातच करिअर करण्याची इच्छा असणारा पण त्यातील भ्रष्टाचारामुळे व्यथित होणारा टिटू, कोणा प्रेमानंद स्वामी फुरसुंगीकरांच्या भोळ्सटपणे नादी लागणारी गौरी, अभ्यासापेक्षा हिंदी चित्रपटांचा अधिक चाहता असलेला गोट्या आणि या सगळ्यांचे तानमान सांभाळणारी पण थोडीशी प्रसंगाचे गांभीर्य न कळणारी सुमंगल असे या कुटुंबाचे थोडक्यात वर्णन करता येईल.

नाटकाला(पहिला अंक) सुरुवात होते ती निवेदक या कुटुंबाची ओळ्ख करुन देत आहेत या प्रसंगाने. अशा या कुटुंबामध्ये चिंतामणी सरनोबत यांचे तीर्थरुप इतिहासाचार्य बिंदूमाधव सरनोबत आणि मातोश्री कमळजा यांचे आगमन होते. चिंतामणी सरनोबत यांना आपला मोठा मुलगा टिटू याचे क्रिकेटमुळे बँकेतल्या नोकरीकडे झालेले दुर्लक्ष, गौरीचे फुरसुंगीकर महाराजांच्या नादी लागणे आणि गोट्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन हिंदी चित्रपट पाहणे अजिबात पसंत नसते. त्यामुळे त्यांचे मुलांवर सतत चिडणे, त्यांच्या चुकांची जाणीव करुन देणे आणी मुलांनी त्यांचे ऐकले नाही की त्यांना घालून पाडून बोलणे हे सगळे बिंदूमाधव सरनोबतांना आवडत नाही.

अशातच अशा काही घटना घडत जातात की, आपली मुले आयुष्यात कधीही चांगली बनू शकणार नाहीत या चिंतामणी सरनोबतांच्या समजुतीला खतपाणीच मिळत जाते. उदाहरणेच द्यायची झाली तर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत टिटूच्या शंभर धावा न होणे, त्याची टीमच्या कप्तानपदी झालेली निवड आणि वाढती प्रसिद्धी यामुळे खेळावरील लक्ष विचलीत होणे, गौरीने फुरसुंगीकर महाराजांच्या नको इतके नादी लागणे आणि त्यांच्याबरोबर एकटीने अंेरिकेला जाण्याचा निर्णय घेणे आणि हिंदी चित्रपटांच्या अति वेडापाई गोट्या दहावीच्या प्रिलिम परीक्षेमध्ये नापास होणे अशा घटना देता येतील.

अशा अडचणींमधून चिडचिड करून नाही तर प्रेमानेही मार्ग काढता येतो, असा 'प्रेमाच्या गावाला जाण्या' चा संदेश या कुटुंबाला देतात आजोबा बिंदूमाधव सरनोबत. गौरीने फुरसुंगीकर महाराजांसारख्या ढोंगी बुवांचा नाद सोडून सर्वसामान्य मुलीप्रमाणे रहावे, गोट्याने चित्रपटांच्या आवडीबरोबरच अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये आणि क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला कंटाळून टिटूने क्रिकेट खेळणे सोडू नये या प्रसंगांमध्ये आजोबा ज्या खुबीने नातवंडांची समजूत घालतात ते प्रसंग नाटकातले अवर्णनिय प्रसंग म्हटले पाहिजेत.ही इतिहासाचार्य बिंदूमाधव सरनोबत ही प्रमूख भूमिका राजेंद्र भिडे अक्षरश: जगले आहेत. याशिवाय आजोबांच्या भूमिकेला साथ देणारी प्राची परांजपे यांची सोज्वळ आजी उत्तमच. चिंतामणी सरनोबत यांच्या स्वभावातील आपल्या मुलांची काळजी, त्यामुळे होणारी चिडचिड आणि सतत घरातल्यांकडे नकारात्मक द्रुष्टीने पाहणे परंतु दुस-या अंकात प्रेमानंद स्वामी फुरसुंगीकरांचा (तथाकथित)साक्षात्कार झाल्यानंतरचे चिंतामणी सरनोबत नचिकेत सरदेसाई यांनी सुंदर साकारले आहेत. गौरी करंदीकर यांनी शांत स्वभावाच्या, घरातल्या सगळ्यांना समजून घेणा-या पण प्रसंगाचे गांभिर्य न कळणारया सुमंगल चिंतामणी सरनोबत छान वठवल्या आहेत.

तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारा चिंतामणी सरनोबतांचा मोठा चिरंजीव विनायक उर्फ टिटू मयुरेश देशपांडे यांनी हुबेहूब उभा केलाय. अतिशय भोळेपणाने फुरसुंगीकर स्वामींच्या नादी लागणारी टिटूची बहिण गौरीचे काम भाग्यश्री भोँडे हिने मस्तच केले आहे. अभ्यासापेक्षा हिंदी चित्रपटांचा चाहता असलेला गजानन चिंतामणी सरनोबत उर्फ गोट्या हर्षवर्धन भिडे याने चांगला साकारला आहे.

नकारात्मक तरीही महत्वाची प्रेमानंद स्वामी फुरसुंगीकर ही भूमिका उपेंद्र वाघ यांनी उत्त्तम केली आहे. सरनोबत परिवाराव्यतिरिक्त टिटूची मैत्रीण असलेल्या प्रियाचा समजुतदारपणा मेघना बेँद्रेने छान दाखवला आहे.गोट्याच्या मित्राची भूमिका करणारा अपूर्व परांजपे, टिटूच्या मित्राची भूमिका करणारा सीआयडी इन्स्पेक्टर समीर बेँद्रे व तुकाराम अर्थात प्रमोद होले यांनी छान साथ दिली आहे.

एकाच नाटकातून बरेच संदेश देणा-या नाटकाचे दिग्दर्शन केले होते दरवषीप्रमाणेच श्री.गौतम करंदीकर यांनी. यावर्षी त्यांनी दिग्दर्शनाबरोबरच नाटकातील निवेदकाचे काम केले होते. नाटकाला संगीत होते संदीप गोरे यांचे तर अनुरूप नेपथ्य उभारले होते सचिन बुचे, जयेश मोहिते, अंोल बर्वे आणि हर्षद फडके यांनी. विशेष सहाय्य होते अनिकेत वैद्य आणि भाग्यश्री सरदेसाई यांचे. नाटकाच्या तिकिट विक्रीची व्यवस्था पाहिली होती रणजित जोशी, धनंजय आडके, विद्या आडके, अनुजा जाधव, प्रमोद होले, जयेश मोहिते, पुष्कराज जहागिरदार,रोहित खळदकर, कविता प्रधान, अभि शेंडे आणि नितिन महाजन यांनी.तिकिट प्रिंटिंगचे काम पाहिले होते प्रसन्न माटे यांनी. वेदवती गोखले,पंकज गोखले, संगीता किणीकर,सुचित्रा जोशी, मृण्मयी देशपांडे आणि मानसी बाजवाला यांनी बच्चे कंपनीला सांभाळायचे काम केले.

२००४/०५/०६/०७ अशी सलग चार वर्षे सफाईदार एडीटिंग करुन नाटकांची उत्तम डिव्हिडी बनव्ण्याचे कौशल्याचे काम केले नचिकेत सरदेसाई यांनी.

नाटकाच्या मध्यंतरात अल्पोपहार देण्याचे काम योगेश सावंत, रोहित खळदकर, कविता मुतालिक, मयुरा देसाई, पुष्कराज जहागिरदार, अनुजा जाधव, केदार भागवत, सुदर्शन पालांडे, बाळकृष्ण कामत, अभि शेंडे, साईयश प्रकाश आणि हर्षद फडके यांनी केले. सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी छानशी गुढी उभारली होती आदिती साठे यांनी. शशिधर वेंकट, शैलेश व्यास आणि बिनू मॅथ्यू यांनी व्हिडियो रेकॉर्डिंग केले तर वैभव शिरोडकर यांनी फोटोग्राफीचे काम पाहिले. सभागृह व्यवस्था पाहिली होती बाळकृष्ण कामत, अनंत गोखले आणि सुनील मुंडले यांनी. कार्यक्रमाचे मुख्य व्यवस्थापन सुदर्शन पालांडे यांनी केले.

ब्लुमिंग्ट्नव्यतिरिक्त सेंट लुई आणि मिलवॉकी येथेही नाटकाचे यशस्वी प्रयोग झाले.

-अमृता सहस्त्रबुद्धे

नाटकाचे पोस्टर / नाटकाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००